राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ही दुर्घटना दुर्दैवी असून विमान प्रवाशांप्रती संवेदना असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे.
ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून दुःख व्यक्त करायला शब्द अपुरे पडत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विमान सेवेच्या सुरक्षेकडे अधिक गांभिर्यानं लक्ष देण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. तसंच विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याच्या सुचना विमान कंपन्यांना केल्या.
ही दुर्घटना हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळं काँग्रेसनं राज्यभरात आयोजित केलेले मशाल मोर्चे पुढचे २ दिवस स्थगित केले आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटनचे प्रधानमंत्री केईर स्टार्मर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.