डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात

अहमदाबाद विमानतळावरुन लंडनकडे उड्डाण केलेलं विमान अवघ्या काही मिनिटात अहमदाबाद विमानतळाच्या जवळ आज दुपारी कोसळलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून २४२ जण होते. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. अहमदाबादमधलं बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतीगृह, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. तिथे राहणारे लोकंही मृत्यूमुखी पडल्याची आणि जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५० जणांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गुजरातचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी दिली. 

 

बोइंग ७८७ प्रकारचं हे विमान होतं. त्यात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगालचे आणि १ कॅनडाचा नागरिक होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या अपघातात निधन झालं.  विमानातल्या कर्मचाऱ्यांमध्ये अपर्णा महाडीक, दीपक पाठक, मैथिली पाटील या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा समावेश होता. दीवमध्ये राहणाऱ्या एका विमान प्रवाशाचा जीव या दुर्घटनेतून वाचला आहे. 

 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. एनडीआरएफ, CISF सह स्थानिक यंत्रणांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. लष्कराच्या १३० अधिकारी आणि जवानांची तुकड़ीही घटनास्थळी मदत कार्यात सहभागी झाली आहे. 

 

या अपघातामुळं अहमदाबाद विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी स्थगित केली होती. अहमदाबाहून मध्यरात्री मुंबई आणि दिल्लीसाठी रेल्वे विशेष गाडी सोड़णार आहे. मुंबई सेंट्रलहून उद्या सकाळी अकरा वाजून १० मिनिटांनी एक गाडी अहमदाबादसाठी रवाना होणार आहे.

 

नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया, गुजरात सरकार यांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना ०७९-२३२-५१९००,  ९९७८४०५३०४, ०११-२४६१०८४३ आणि ९६५०३९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा