लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भोपाळ इथं आयोजित ‘देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात’ बोलत होते. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य, कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असं ते यावेळी म्हणाले.
अहिल्यादेवींनी एक उत्तम प्रशासक आणि लोकशाहीचं उत्तम प्रमाण सादर केलं. जलसंवर्धनाचं महत्व अधोरेखित करत त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचा उद्धार केला आणि तीनशे वर्षांपूर्वीच्या गुलामगिरीच्या काळात सशक्त राज्य उभारत स्त्री शक्तीचा समाजासमोर आदर्श ठेवला, असं प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. तर इंदूरच्या मेट्रो स्थानकाचं त्यांनी यावेळी दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.