ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज व्यक्त करतानाच ‘लॅब टू लँड’ उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारने कृषी शास्त्रज्ञांना कृषी विस्तार उपक्रम राबवायला केंद्र सरकार प्रोत्साहन देत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आजपासून येत्या २४ नोव्हेंबर पर्यंत नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरच्या मैदानावर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाची आणि जोडव्यवसायाची माहिती व्हावी, त्याचा उपयोग उत्पन्न वाढीसाठी व्हावा या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं.