डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाड इथल्या भूस्खलनानं बाधित लोकांच्या पाठीशी उभा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 
 

केरळमधल्या वायनाड इथं झालेल्या भूस्खलनामुळे बाधित लोकांच्या पाठीशी संपूर्ण देश आणि केंद्र सरकार उभं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज वायनाड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन कामाबाबत आढावा बैठकीला संबोधित केलं. मदतकार्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं  आश्वासन त्यांनी दिलं. यादृष्टीनं राज्याच्या गरजांबाबत तपशीलवार निवेदन पाठवावं असं आवाहन त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केलं. राज्य सरकारनं भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मुलांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करावी अशी सूचनाही त्यांनी केली. 

केरळचे राज्यपाल, मुख्यमंत्री पिनाराई विजयन, आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बेठकीत सहभागी झाले होते.

याआधी आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त प्रदेशाला  भेट दिली. त्यांनी आपतग्रस्त प्रदेशाचं हवाई सर्वेक्षण केलं. तसंच बचाव आणि मदतकार्याची माहिती घेतली. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यावेळी प्रधानमंत्र्यांसोबत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी मदत शिबिरं तसंच रुग्णालयांनाही भेट दिली. दुर्घटनेत जखमी झालेल्यां आणि मृतांच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला.

या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं अशी मागणी राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या विरोधी पक्षांनी केली आहे. 

दरम्यान, वायनाडमध्ये केंद्र सरकारने राबवलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत ३० जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर ५२० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. घटनास्थळावरून ११२ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.