मुंबई महानगरपालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सहा हजार कोटींच्या निविदा काढल्या, मात्र गेल्यावर्षी निविदा काढलेलं एकही काम झालेलं नसून पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मागच्या वर्षी निविदा काढलेली किती कामं पूर्ण झाली, ज्या कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला होता तो आकारण्यात आला का, असा सवालही ठाकरे यांनी विचारला. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पालिकेनं काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आपण सर्वांची कामांची चौकशी करणार असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.