ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
लष्करातून कॅप्टन म्हणून १९६७ मधे निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑईलमधे नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला. मराठी रंगभूमी, दूरचित्रवाहिनी मालिका, आणि चित्रपटांमधे विविध चरित्र भूमिकांमधे त्यांनी ठसा उमटवला. १९८० मधे ‘आक्रोश’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या गाजलेल्या चित्रपटांमधे त्यांनी त्यांच्या अभिनयाची चमक दाखवली आणि नंतर ‘अर्धसत्य’, ‘नासूर’, ‘तेजाब’, ‘प्रहार’, ‘वंश’, ‘चमत्कार’, ‘रंगीला’, ‘अग्निसाक्षी’, ‘तीसरी आंख’, ‘परिणीता’ अशा तब्बल सव्वाशे चित्रपटांमधे त्यांनी काम केलं. ‘थ्री ईडियट्स’ या चित्रपटातला “अरे कहना क्या चाहते हो?” हा त्यांचा संवाद तुफान लोकप्रिय ठरला. त्याखेरीज ९५ दूरचित्रवाहिनी मालिका, २६ नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत.