आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या सोहळ्यासाठी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरी इथं अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांना विठ्ठलाच्या भेटीची आतुरता लागली असून पंढरपुरात ५ लाखांपेक्षा जास्त वारकरी दाखल झाले आहेत. पंढरपुरात, नगर प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका प्राथमिक उपचार केंद्रातून सेवा देण्याचं काम सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी येणार्या भाविकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी जीवरक्षक बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळानं साडे पाच हजार जादा बसगाड्यांचं नियोजन केलं आहे.
राज्यात कृषी क्षेत्रात दरवर्षी ५ हजार कोटी याप्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, नानाजी देशमुख योजनेच्या माध्यमातून गावात संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून लहानात लहान शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंढरपूरात कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. कृषी प्रदर्शनातून माती परीक्षणापासून कापणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्यानं या प्रदर्शनाचं महत्त्व अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं.