January 15, 2026 1:50 PM | 78th Army Day

printer

आज ७८वा सेना दिवस

देशभरात आज ७८वा सेना दिवस साजरा होत आहे. सेना दिनानिमित्त शूर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सैन्यदलं वचनबद्ध आहेत, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात आणि आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जातात, देशावरची त्यांची अविचल निष्ठा देशवासियांना सतत प्रेरणा देत राहते, असंही त्या म्हणाल्या. 

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शूर सैन्याधिकारी, सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करत सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सैनिकांचं शौर्य, शिस्त आणि त्यागामुळे देशाचं रक्षण होतं, असं ते म्हणाले.  

 

देशाचे सैनिक हे निस्वार्थ सेवा आणि दृढ वचनबद्धतेचं प्रतीक आहेत, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. हे निस्वार्थ भावनेचं प्रतीक असून त्यांच्यामुळे देशवासियांमधे आत्मविश्वासाची भावना निर्माण होते, असं ते म्हणाले. 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनही सेना दिवसानिमित्त भारतीय सैन्यदलाला शुभेच्छा दिल्या. आधुनिक आणि आत्मनिर्भर सैन्यदल उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. 

 

सेनादिनानिमित्त जयपूरमधे आज सेनादलाचं संचलन होत आहे. जगतपुरा इथं हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय सैन्यदलाचे जवान आपली शिस्त, सामर्थ्य आणि लष्करी क्षमतांचं प्रदर्शन करत आहेत. राजस्थानचे मुुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.