४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथदिंडीत लेझीम पथक, लाठी काठी पथक, भजनी मंडळ सहभागी झालं होतं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून या कलाकारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.
त्यानंतर मुख्य मंडपात संमेलनाध्यक्ष डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. पालकमंत्री संजय शिरसाट, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष विजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उद्यापर्यंत चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.