January 24, 2026 7:17 PM | 26 january

printer

प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम संपन्न

७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल कर्तव्य पथावर झाली. भारताचा समृद्ध वारसा, लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वैविध्य यांचं प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षानं दिसून आलं. संरक्षण दलाच्या विविध कवायत तुकड्या तसंच राज्यं, केंद्रशासित प्रदेश, काही मंत्रालयं आणि विभाग यांचे चित्ररथ पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमधे आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये देशानं मिळवलेला विजय आणि तीनही सैन्य दलांचा समन्वय यांचं दर्शन घडवणारा लष्कराचा चित्ररथ पाहायला मिळेल, असं दिल्ली उपविभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नवराज धिल्लों यांनी काल सांगितलं. रणगाडे, क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन यांच्या सहाय्यानं प्रथमच युद्धभूमीवरील रचना सादर केली जाणार आहे. सुमारे 6 हजार 50 सैनिक यात सहभागी होणार असून लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार चौथ्यांदा नेतृत्व करणार आहेत. पहिल्यांदाच भैरव बटालियन, शक्तिवान रेजिमेंट आणि लडाख स्काऊट संचलनात भाग घेणार आहेत. यंदा सैन्याचं प्राणी पथकही प्रथमच कर्तव्यपथावर संचलनात सहभागी होणार आहे.