‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात सगळीकडे वंदे मातरम् या गीताचं स्मरण करण्यात आलं. मुंबईमध्ये राजभवनात राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांच्या उपस्थितीत तर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम् गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातही कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं.
ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध वाद्यांसह सामुहिकरीत्या वंदे मातरम् गीताचं गायन तसंच पथनाट्य देखील सादर करण्यात आलं. धुळे शहरात इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवपूर धुळे इथं ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आलं.
सोलापूरमध्ये ४५ शाळा- महाविद्यालयातल्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी आज वंदे मातरम हे गीत म्हटलं. पनवेलमध्ये महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम् गीता संदर्भात सखोल माहिती देण्यात आली. गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आज वंदे मातरम गीताचं सामूहिक वाचन करण्यात आलं. वाशीम, अकोला सांगली, नाशिक या जिल्ह्यांमध्येही वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं.