गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंतची मजल मारली आहे.
गेल्या अकरा वर्षांत सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. जनधन योजनेतून ५५ कोटी जनतेला फायदा झाला आहे, ही संख्या यूरोपियन महासंघातल्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत ८१ कोटी जणांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला असून ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी आहे. १५ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. २५ कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य योजनेचं कार्डवाटप झालं आहे.
सुमारे ४४ लाख कोटी रुपयांची थेट कर्जंही मंजूर झाली आहेत. तर मुद्रा योजनेद्वारे लघुउद्योगांना ५२ कोटींहून अधिक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. भारत आज फक्त सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणारा आवाज झाला आहे. भारताच्या विकास यात्रेविषयी नमो अॅपवर उपलब्ध व्हिडीओ, ग्राफिक्स आणि लेख यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.