भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन- तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतला अखेरचा आणि पाचवा सामना आज भारतानं सहा धावांनी जिंकला. विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव ३६७ धावात आटोपला. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तोच सामनावीर ठरला. या विजयामुळे ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
लंडनच्या ओव्हल मैदानावर आज पाचव्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा ६ बाद ३४७ या कालच्या धावसंख्येवरून इंग्लंडनं खेळायला सुरूवात केली. त्यांना विजयासाठी अवघ्या ३५ धावा हव्या होत्या. हे आव्हान ते सहजपणे पेलतील असं वाटत असतानाच पुढच्या सात धावांत त्यांचे तीन गडी तंबूत परतले आणि सामना रंगतदार अवस्थेत पोचला. त्यानंतर विजयासाठी अवघ्या २० धावा हव्या होत्या आणि त्यांचा एक गडी बाकी होता. सिराजनं टाकलेल्या सुरेख बॉलवर गस अटकिनसन बाद झाला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.