७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज झाली आहे. या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन होणार आहे.
महाराष्ट्राच्या वतीने ‘गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य चित्ररथाचे संचलन यावेळी होणार आहे. या चित्ररथातून राज्याची पंरपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृष्य साकारलं जाणार आहे. अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली.
यंदा प्रथमच ‘बॅटल ॲरे’ या युद्ध रचनेचं प्रदर्शन होणार असून अर्जुन टँक, टी-९० भीष्म, राफेल विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक दर्शन घडवले जाईल. संचलनात लष्कराच्या १८ तुकड्या आणि १३ बँड्ससह एकूण ३० चित्ररथ सहभागी होतील. अडीच हजार कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरवानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा भारदस्त आवाज लाभणार आहे. यावेळी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं असून यात इस्रोचे शास्त्रज्ञ, लखपती दीदी आणि प्रगत शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी ‘राष्ट्रपर्व’ हे विशेष पोर्टल आणि ॲप विकसित करण्यात आले असून, तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात आलं आहे.