केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ संयुक्तपणे नवी दिल्ली इथं या महिन्याच्या २४ तारखेला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करणार आहेत. ही शिखर परिषद सामूहिक ज्ञान, संयुक्त आवाज आणि परस्पर सहअस्तित्व या संकल्पनेवर आयोजित केली जाईल, अशी माहिती मंत्रालयानं दिली. सामाजिक सौहार्द जोपासण्यासाठी आणि रचनात्मक आंतरराष्ट्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्ध तत्वज्ञानाची प्रासंगिकता अधिक दृढ करण्याविषयी ही संकल्पना आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी होत असून यात सर्वोच्च कुलगुरू, राष्ट्रीय बौद्ध संघांचे प्रमुख, प्रख्यात भिक्षू, विद्वान आणि जगभरातील ज्येष्ठ मान्यवरांचा समावेश असल्याचं मंत्रालयानं पुढं म्हंटलं आहे. जलद तांत्रिक प्रगतीच्या युगात बुद्ध धम्माची मूलभूत मूल्यं, नैतिक नेतृत्व, सामाजिक सौहार्द आणि शाश्वत जीवन कसं प्रेरित करू शकतात यावर चर्चा देखील या शिखर परिषदेत होईल.