स्टार्टअप अभियानानं गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

स्टार्ट अप अभियानाने गेल्या १० वर्षांमधे क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या दहा वर्षात अनुभवला असल्याचं ते म्हणाले.

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं की २०१६ मधे ही मोहीम सुरु झाली त्यावेळी अवघे ४०० स्टार्टअप होते, ती संख्या आता दोन लाखांवर गेली आहे. या कार्यक्रमात  प्रधानमंत्र्यांनी स्टार्ट अप उद्योजकांशी संवाद साधला.

 

स्टार्ट अप संकल्पना कार्यान्वित झाल्याच्या दशकपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. नवोन्मेषाला चालना, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. २०१४ नंतर दीड लाखापेक्षा जास्त नवीन उपक्रम सुरु झाले, सुमारे साडे १७ लाख रोजगारनिर्मिती झाली असून, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरला आहे.