सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात, देशाच्या विकासात ही खरी भागीदारी होऊ शकते असंही मुर्मू म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींच्या आधारे त्यांच्या भविष्यातील कारकीर्द निवड करण्याचा सल्ला दिला. भारताच्या स्वच्छता सर्वेक्षणात सलग सात वेळा प्रथम क्रमांक मिळविलेल्या इंदूरचं कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाल्या की इंदूरच्या नागरिकांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात एक विलक्षण आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. मध्य प्रदेशचा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू झारखंडमधील रांची इथं पोहोचल्या आहेत. रांची इथल्या ICAR-राष्ट्रीय दुय्यम कृषी संस्थेच्या शताब्दी सोहोळ्यात त्या आज संबोधित करणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.