पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामाला आहेत. दोन्ही पालख्यांचं काल पुण्यात स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून उत्साहात स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली.
आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल. उद्या सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भवानी पेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचं दर्शन घेतलं आणि पालखीची पूजा केली.
संत नामदेव महाराजांच्या दिंडीचं परभणी जिल्ह्यात आगमन झालं. नांदगाव आणि श्री क्षेत्र त्रिधारा इथं दिंडीचं स्वागत करण्यात आलं. पालखी आज परभणी शहरात मुक्कामी असून उद्या सकाळी गंगाखेडकडे मार्गस्थ होणार आहे. या वारीमध्ये ७०० पेक्षा अधिक भाविक२ अश्व सहभागी झाले आहेत.