धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली, तर विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, असे निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं.
विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, प्रवासाला अधिक विलंब झाला, तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था करावी, तिकीट रद्द झालं, तर पुन्हा आरक्षण अथवा तिकिटाच्या पैशाचा परतावा करण्याची व्यवस्था करावी, तसंच वेळेवर ‘चेक-इन’ केल्यावर ‘बोर्डिंग’ साठी मनाई करू नये, असं यात म्हटलं आहे. सामानाची हाताळणी आणि अल्पवयीन मुलांची देखभाल, याबाबतच्या सूचनाही यात दिल्या आहेत.