राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं.
राजधानी मुंबईत आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला तर शहर परिसरात हलका पाऊस पडला. बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड, चांदवड या सर्व तालुक्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं कांदा, कांदा बियाणं, मका, हरभरा आणि डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं.
गोंदियातही पावसानं धान पिकाला मोठा फटका बसला. पावसामुळे कापणीला आलेली भाताची पिकं आडवी झाली.
धुळे जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा जोरदार पाऊस झाला. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली.
राज्याच्या बहुतांश भागांत आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.