मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.
पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासांत पालघर वगळता कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितलं.
दरम्यान, आगामी ४८ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे मुंबई आणि पालघरला यलो अलर्ट जारी केला आहे. घाट विभाग, सातारा, कोल्हापूर इथंही पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आगामी २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.