युरोपियन युनियन आणि ‘मर्कोसुर’ या दक्षिण अमेरिकन व्यापार गटात काल पॅराग्वेची राजधानी असुनसिओन इथं मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या करारामुळे जगातल्या सर्वात मोठ्या व्यापार क्षेत्रांपैकी एक क्षेत्र निर्माण झालं असून, या करारा अंतर्गत अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे आणि उरुग्वेसह युरोपियन युनियन आणि मर्कोसुर देशांदरम्यानच्या व्यापारात ९० टक्क्यांपेक्षा जास्त कर कपात केली जाईल. मात्र काही वस्तूंवरच्या आयात शुल्कात येत्या १० ते १५ वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं कपात केली जाईल.
या करारात युरोपियन युनियनच्या २७ सदस्य देशांचा समावेश आहे, मात्र ऑस्ट्रिया, फ्रान्स, हंगेरी, आयर्लंड आणि पोलंड या देशांचा त्याला विरोध आहे. या कराराला युरोपियन संसदेची आणि मर्कोसुर देशांची मान्यता मिळाल्यावर तो लागू होईल.
दरम्यान, हा करार म्हणजे ‘भू-राजकीय विजय’ असून, यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये निर्यात आणि रोजगाराला चालना मिळेल असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष ‘उर्सुला वॉन डेर लेयन’ यांनी म्हटलं आहे.