मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. चक्रीवादळामुळे ९० ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत आहे. तसंच आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे हवामान विभगानं आंध्र प्रदेशातल्या १९ जिल्ह्यांना अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एन चंद्राबाबु नायडू आणि उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि प्रशासनाला वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागात मदत आणि बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी, ओदिशा, छत्तीसगड या राज्यांमधे मदत आणि बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची २६ पथकं तैनात केली आहेत. तर १९ पथकं राखीव ठेवली आहेत.