राज्यातल्या २८८ नगरपरिषदांच्या आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे.
बीडमधे मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
२ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत ६७ पूर्णांक ३ दशांश टक्के मतदान झालं तर २० डिसेंबरला झालेल्या टप्प्यात ४७ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदारांनी आपला कौल यंत्रात बंद केला, असं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या.
मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही. मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणुकीच्या निकालांच्या बातम्या दिल्या आहेत. त्यानुसार बहुतांश ठिकाणी महायुतीतल्या पक्षांच्या उमेदवारांची सरशी झालेली दिसते.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगर परिषदांमध्ये चार ठिकाणी शिवसेना, दोन ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं. खेड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व २१ जागांवर महायुतीचा विजय झाला.
सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मालवणमध्ये शिवसेना तर कणकवलीत शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे.
रायगडमध्ये अलिबाग इथं शेकापनं आपलं वर्चस्व अबाधित राखलं. तिथं शेकापच्या अक्षया नाईक विजयी झाल्या. पेण नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रितम पाटील विजयी झाल्या तर खोपोलीत आणि माथेरानमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. कर्जत मध्ये आघाडीच्या पुष्पा दगडे विजयी झाले आहेत..
लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपरिषदेत नराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे स्वप्निल व्हत्ते विजयी झाले. नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं १६ जागांवर विजय मिळवला. भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शिवसेनेनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.
उदगीर आणि निलंग्यात भाजपानं, तर औसा इथं राष्ट्रवादीच्या उमेदवारानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
नाशिकमध्येही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांपैकी भगूर नगरपालिकेत २७ वर्षांनी सत्तांतर झालं. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे निवडून आल्या. येवला आणि सिन्नरच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला.
चांदवडमध्ये भाजपानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, तर इगतपुरीमध्ये शिवनेच्या शालिनी खातळे विजयी झाल्या.
अहिल्यानगरमध्ये राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगावमध्ये भाजपानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. संगमनेरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे विजयी झाल्या. श्रीरामपूरमध्ये काँग्रेस, तर शेवगाव आणि नेवासा इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली.
धुळ्यात शिंदखेड्याचं नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आलं आहे.
नंदूरबारमध्ये नवापूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली.
सोलापूर जिल्ह्यातल्या १२ नगरपरिषदांपैकी चार ठिकाणी भाजपा आणि ३ ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला. तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी २ ठिकाणी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासह, स्थानिक आघाडीनं प्रत्येकी एका नगरपरिषदेवर सत्ता मिळविली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आणि पैठण इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर कन्नड आणि खुलताबादमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं गंगापूर, भाजपानं वैजापूर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फुलंब्रीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
सांगली जिल्ह्यात आटपाडी आणि ‘जत’ मध्ये भाजपाचे, शिराळा आणि विटा इथं शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. तर ईश्वरपूर इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आष्ट्यात स्थानिक आघाडी, पलूसमध्ये काँग्रेस आणि तासगाव इथं स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार निवडून आले.
नागपूर मध्ये बेसा पिपळा, भिवापूर, बहादूरा या तीन ठिकाणी भाजपाचे उमेदावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर मोहपा इथं काँग्रेसच्या उमेदवारानं बाजी मारली.