महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
कालपर्यंत 17 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिलं. पडलेली घरं, खरडलेल्या जमिनी यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळणार असून आपत्ती व्यवस्थापन निधीतून वाटप सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.
धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली.
धाराशिव जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून दर काही दिवसांनी उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 363 गावं बाधित झाली असून दोन लाख 26 हजार 706 हेक्टर क्षेत्रावरील शेती पाण्याखाली गेली आहे. या अतिवृष्टीचा फटका एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 498 नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, तसंच जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकानं आणि लष्कराच्या जवानांनी सुटका केली आहे. बाधित क्षेत्रांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलं. याशिवाय परंडा तालुक्यातील अनेक गावात नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि अन्नाची पाकिट पुरवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक मेहनत करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सीना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियंत्रण व्यवस्थापनामध्ये समन्वय ठेवला नाही. त्यामुळे हा पूर आल्याच्या तक्रारी आल्या असून या अनुषंगानं चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं.
बीड जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधील पूरपरिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून…
बीड जिल्ह्यात सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या २०० हून अधिक मध्यम आणि लघुप्रकल्पांना पूराचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तलाव, बंधारे, रस्ते आणि पुलांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसंच लाखो हेक्टरावर शेती जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. माजलगाव प्रकल्प हा शंभर टक्के भरलेला असून इतर 167 मध्यम आणि लघु प्रकल्प शंभर टक्के भरुन वहात आहेत.
केज आणि माजलगाव तालुक्यातल्या ४ गावांमधल्या नागरिकांना पूर परिस्थितीमुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. बीड, गेवराई तालुक्यात पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या ४० पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आष्टी तालुक्यातल्या कडी नदीला महापूर आल्यानं सैन्य दलानं हेलीकॉप्टरच्या सहाय्यानं नागरिकांना स्थलांतरीत केलं.
बुलडाणा जिल्ह्यात पालकमंत्री संजय सावकारे, हिंगोली जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तर नांदेड जिल्ह्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कापूस, मका, बाजरी, ज्वारी, भाजीपाला आणि फळ बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे.
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांनं स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं धाराशिव, परभणी, बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांसाठी मोहीमा राबवल्या तसंच तातडीची मदत पोहोचवली.
पूरग्रस्तांना मदत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी एक दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.