डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिला नसून. कोणत्याही मतदार संघात मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. 

महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानंच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची ही भाजपाची  सुरुवात आहे, अशी टीका त्यांनी केली. महायुती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेनं केला आहे. त्यामुळे आता हे सरकार जाऊन जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारं महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर इथं संविधान सन्मान संमेलन आयोजित केलं असून, संध्याकाळी मुंबईत बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिली.