राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. यात निवडणूक प्रक्रियेसह मतदान यंत्र हाताळणीची माहिती दिली जात आहे. निवडणुकीचं कर्तव्य बजावणे आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणे प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलं आहे.
निवडणूक कामांसाठी गैरहजर राहिलेल्या ७९ कर्मचाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच २४ तासांच्या आत कामाच्या ठिकाणी हजर न झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल, असा इशाराही या नोटिशीत दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित २८ वॉर्डांमधले १,१५१ मतदान केंद्रे येतात. महापालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.