भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो, योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्या काल एका मुलाखतीत म्हणाल्या. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही, बहुतेक सर्व म्हणजे ९९ टक्के वस्तू आणि सेवा आता शून्य किंवा पाच किंवा १८ टक्के स्लॅब अंतर्गत येतात, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेनं ५० टक्के आयातशुल्क केल्यामुळे ज्या निर्यातदारांना फटका बसला आहे, त्यांच्यासाठी काही उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट केवळ सर्व वस्तूंचं उत्पादन भारतात करायचं असं नाही तर अनिश्चित जागतिक परिस्थितीत आत्मसन्मान अबाधित राखणं असाही आहे, असं सीतारामन म्हणाल्या.