फ्रान्स आणि लॅक्झेंबर्गचा दौरा आटोपून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मायदेशी परतले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत आणि युरोप यांचे हितसंबंध परस्परपूरक असल्याचं या दौऱ्यामधून दिसून आल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
या दौऱ्यात जयशंकर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. तसंच फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, सागरी सुरक्षा, आर्थिक सहकार्य, नागरी अणुऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स,आरोग्य, शिक्षण, अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या दौऱ्यात जयशंकर यांनी फ्रान्सच्या लोकप्रतिनिधींनाही संबोधित केलं.
फ्रान्सच्या राजदूतांच्या परिषदेत जयशंकर यांचं भाषण झालं. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते पहिले, युरोपबाहेरचे परराष्ट्र मंत्री ठरले.
लॅक्झेंबर्गमध्ये जयशंकर यांनी प्रधानमंत्री ल्युक फ्रीडेन आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. तसंच तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित केलं.