भारताच्या कौशल्य विकासाला दिशा देण्यासाठी पीएम-सेतु योजनेअंतर्गत, पुण्यात यशदा इथं उद्या एक उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासकीय तंत्र निकेतनांमध्ये उद्योगांच्या मदतीनं सुधारणा करुन त्यांना उद्योग-व्यवस्थापित संस्था बनविण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा होत आहे.
पीएम सेतु म्हणजे म्हणजे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs ही योजना विकसित भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून,भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ घडविणे, उद्योग क्षेत्राचा या योजनेत सहभाग वाढवणे तसंच जनजागृती करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेत बांधकाम, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, FMCG, इलेक्ट्रॉनिक्स, तेल आणि वायू तसंच नवीकरणीय ऊर्जा अशा विविध क्षेत्रांतील ५० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
PM-SETU अंतर्गत देशभरातील १,००० शासकीय ITI चे आधुनिकीकरण हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये २०० हब ITI ना प्रगत पायाभूत सुविधा आणि आधुनिक प्रशिक्षण साधनांसाठी सहाय्य दिले जाईल, तर ८०० स्पोक ITI जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचा विस्तार करतील. या योजनेअंतर्गत ITI या शासकीय मालकीच्या पण उद्योग-व्यवस्थापित संस्था म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या सल्लामसलतीचा भाग म्हणून, उद्योग आणि संस्थांमधील भागीदारीसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. संस्थात्मक प्रशासन मजबूत करणे, प्रशिक्षण परिसंस्थेचे आधुनिकीकरण आणि कौशल्यांचा कामगार बाजाराच्या मागणीशी मेळ घालणे या माध्यमातून ही योजना विकसित भारत घडविण्यासाठी भारतातील युवकांना सज्ज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.