नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचा आदेश दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयानं आज राखून ठेवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलैला होईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात काँग्रेस नेत्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचे आरोप झाले आहेत. या पुरवणी आरोपपत्रातले सर्व आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावले असून, या याचिकेची दखल घेण्यास विरोध केला आहे.
नॅशनल हेरॉल्डची प्रकाशन संस्था असलेल्या असोसिएडेट जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या मालमत्तेचा गैरवापर करत दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. तसंच नॅशनल हेरॉल्डची मालमत्ता यंग इंडियन या कंपनीनं फसवणूक करून ताब्यात घेतली. यंग इंडिया कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रमुख हिस्सा असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.