दक्षिण गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवर विविध प्रकारचे फटाके, आतिशबाजी करणारी उपकरणं, ज्वालाग्रही पदार्थ यांच्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. ही बंदी सर्व नाईटक्लब, बार आणि रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्टहाऊस, बीच शॅक, तात्पुरता निवारा, कार्यक्रम स्थळं तसंच मनोरंजनासाठीच्या स्थळांना लागू करण्यात आली आहे. गोव्यात आरपोरा इथं नुकत्याच झालेल्या नाईटक्लब दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी जारी करण्यात आली आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र कडक सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. आज त्यांनी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. उपाययोजना करण्यात कोणताही हलगर्जीपणा न करण्याचे आदेश मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत.