दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत काल झालेल्या एका सत्रात बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, जी-२० आफ्रिका-कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात, जी-२० जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपक्रम असे महत्त्वपूर्ण प्रस्ताव आपल्या भाषणातून मांडले.
या परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांनी काल अमेरिकेचा विरोध डावलून संयुक्त जाहीरनाम्याला एकमतानं मंजूरी दिली. या जाहीरनाम्यात हवामान विषयक जागतिक संकटासह, विविध जागतिक समस्यांचा अंतर्भाव आहे. हा निर्णय आफ्रिका खंडासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, बहुपक्षवादाला मिळालेलं मोठं पाठबळ असल्याची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य मंत्री रोनाल्ड लामोला यांनी व्यक्त केली.
जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेची आज सांगता होत आहे. या शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. “सर्वांसाठी निष्पक्ष आणि न्याय्य भविष्य – महत्वपूर्ण खनिजे, योग्य कार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता” ही या सत्राची मुख्य संकल्पना आहे.