भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान ३ मोहिमेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या मोहिमेचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडर आणि रोव्हर उतरवणं तसंच संपूर्ण लँडिंग आणि रोव्हर प्रकियेचं प्रात्यक्षिक दाखवणं हा होता. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या LVM3 M4 रॉकेटद्वारे चांद्रयान-३ चं यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं.
तर, २३ ऑगस्ट २०२३ रोजी, चांद्रयान-३ चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट-लँडिंग झालं. या लँडिंगमुळे चंंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनला. या मोहिमेदरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावरच्या प्लाझ्माचे मोजमाप, खनिज, माती इत्यादींबाबत माहिती घेण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेला शिवशक्ती असं नाव दिलं आहे.