शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टी आपल्याला शांततेच्या सुरात नेऊन ठेवतात. पुण्यात आयोजित पुल स्मृती सन्मान सोहळ्यात पंडित अजय चक्रवर्ती यांचे सूर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शब्दांनी भाव आणि बुद्धी, रस आणि तर्क, गाणं आणि ज्ञान या साऱ्यांचा सुंदर संगम घडविला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
ग्लोबल पुलोत्सवाच्या समारोप समारंभात पंडित अजय चक्रवर्ती यांचा डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते काल पुल स्मृती सन्मान देऊन गौरव करण्यात आला, त्या वेळी माशेलकर बोलत होते. या सन्मान सोहळ्यानं तीन दिवसीय ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप झाला.
तत्पूर्वी, ‘आस्वादक पुलं’ या परिसंवादातून पुलंच्या रसिकत्वाचं दर्शन उपस्थित रसिकांना घडविण्यात आलं. पुलंना कलेमागील माणूसही महत्त्वाचा वाटायचा. आस्वादक वृत्तीला कृतीची जोड देत पुलंनी रसिकता जोपासली अशी भावना मान्यवर वक्त्यांनी या परिसंवादात व्यक्त केली.