पुणे ग्रँड चॅलेंज सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सज्जता करण्यात आली आहे. उद्यापासून २३ तारखेपर्यंत जिल्ह्यातील ४३७ किलोमीटर मार्गावरून जगभरातील 35 संघांमधील 170 आणि भारताचे अ आणि ब संघातील सायकलपटू पुण्याचा नागरी परिसर, वारसा-संपन्न स्थळं आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून सायकल चालविण्याचं आव्हान एकंदर चार टप्प्यांमध्ये पार करणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा स्वागत समारंभ आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पुण्यात झालं. पुण्याचा सायकलींशी असलेला ऋणानुबंध १०० वर्षांहून अधिक जुना आहे. ही स्पर्धा पुण्याची ‘सायकलचे शहर‘ ही ऐतिहासिक ओळख जागतिक स्तरावर पुन्हा एकदा प्रस्थापित करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध देशातील सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला.
विविध भाषा, देश आणि संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे हे सायकलपटू भारतीय पारंपरिक वेशात मंचावर आले होते.
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या उद्या पुण्यातील टप्प्यामुळं फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, शहरातील मध्यभाग, तसंच स्पर्धा मार्गावरील शाळा-महाविद्यालायांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान स्पर्धा मार्ग, तसंच जोडणारे उपरस्ते वाहतुकीला बंद राहतील अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या मार्गांवरुन कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.