डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 6, 2025 1:45 PM

printer

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई-पुण्यासह स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे. ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. वाहतुकीचं नियमन केलं असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनाची चोख तयारी केली आहे. विसर्जनासाठी चौपाट्यांसह ७० नैसर्गिक स्थळ आणि सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. मुंबईतल्या २९० कृत्रिम तलावांची यादी www.mcgm.gov.in संकेतस्थळावर गुगल मॅप लिंकसह उपलब्ध आहे. QR कोड स्कॅन किंवा BMC WhatsApp Chatbot: ८९९९२२८९९९ वरून  उपलब्ध केली असल्याची माहिती पालिकेनं  दिली आहे.

मुंबईत विसर्जन सोहळ्यासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलीसही सज्ज आहेत. १८ हजाराहून अधिक पोलीस मुंबईत ठिकठिकाणी तैनात केले आहेत. तसंच १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही विसर्जन सोहळयावर लक्ष ठेवण्यात येत आहे.