अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत देशभरात आतापर्यंत १६० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. भाजपाचे गोडम नागेश आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या योजने अंतर्गत एक हजार ३०० स्थानकांचा विकास केला जाईल, तसंच प्रवाशांसाठी सोयी सुविधा तयार केल्या जातील, असं वैष्णव म्हणाले.
गेल्या अकरा वर्षांत देशभरात दहा हजार १७० टपाल कार्यालयं उभारण्यात आल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत सांगितलं. भारताची टपाल यंत्रणा जगातल्या सर्वात मोठ्या टपाल यंत्रणांपैकी एक असून देशभरात १ लाख ६४ हजार टपाल कार्यालयं आहेत, असं त्यांनी सांगितलं. टपाल यंत्रणा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, गेल्या तीन वर्षांत नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ९०३ नवी टपाल कार्यालयं उघडण्यात आली. बँका नसलेल्या गावांमधे पाच हजार ७४६ टपाल कार्यालयं मंजूर झाली असून त्यापैकी ६५७ कार्यालयं सुरू झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
२०३० पर्यंत १० कोटी टन कोळशापासून इंधन वायू निर्मिती प्रकल्पाचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं असून यासाठी ८५ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री सतीशचंद्र दुबे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. देशातल्या सात इंधन वायू निर्मिती प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळे भारताचं तेल, मिथेनॉल आणि अमोनिया यांच्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे. इंधन वायू निर्मिती प्रकल्पाद्वारे युरिया तसंच इतर रसायनांची निर्मिती होईल, त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असं दुबे म्हणाले.