वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे अनेक बदल कररचनेत झाले आहेत. फक्त शेतात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे टायर्स आणि ट्यूब, ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीचे टायर्स आणि ट्यूब यांच्यावरचा कर ५ टक्क्यांवर आला आहे. खत निर्मितीसाठी वापरले जाणारे काही पदार्थ, कीटकनाशकांचे घटक पदार्थ, कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं, यांच्यावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरुन उतरुन ५ टक्के झाला आहे.
मात्र तंबाखू सेवनाला प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीनं पानमसाला, तंबाखूची इतर उत्पादनं , ई सिगरेटसारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादनं यावरचा कर २८ टक्क्यांवरुन वाढवून ४० टक्के करण्यात आला आहे. याला अपवाद फक्त तेंदुपत्त्यापासून तयार होणाऱ्या विड्यांचा असून त्यावरचा कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. नवीन कररचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.