डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात ठिकठिकाणी भक्तीभावानं गणरायाला निरोप

राज्यात इतरत्रही भक्तीभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं.

पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं, मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातही ढोल तश्याच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला. अमळनेर इथं आज पहाटे ५ वाजेपर्यंत, तर शहरात रात्री १ वाजेपर्यंत मुख्य मिरवणूका सुरू होत्या. या मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमुळे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

नाशिक शहरातही १५ तासांच्या उत्साही मिरवणुकीनंतर गणरायाला निरोप दिला गेला. गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीवरील रामकुंड इथं विशेष नियोजन केलं गेलं होतं.

छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा साडेअठराशेपेक्षा जास्त सार्वजनिक तर २५ हजारांपेक्षा जास्त  घरगुती गणेशमूर्तीचं विसर्जन केलं गेलं.  मोठ्या संख्येनं कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. 

लातूरमध्ये गंजगोलाई परिसरात विविध देखाव्यांनी सजलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकींतून पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकता, संस्कृतीविषयक संदेश दिले गेले.
कोल्हापूरात डॉल्बी तसंच पारंपारिक वाद्यासंह भक्तिमय वातावरणात सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. सकाळी नऊ नंतर मानाचा तुकाराम माळी तालिम मंडळाच्या गणेशाचं पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरात महापालिकेच्यावतीनं मूर्ती दान करायची व्यवस्था केली होती, तर ठिक ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्थाही केली गेली होती.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.