बांग्लादेशातील अत्याचारांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला राज्यात हिंसक वळण

बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात काही धार्मिक संघटनांनी बंद पुकारला होता. त्याला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं.

 

नाशिकमध्ये काही दुकानदारांनी बंदला विरोध केल्यानंतर दुकान बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह काही जण जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता असून संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

जळगावमध्येही निषेध मोर्चा दरम्यान काही आंदोलकांनी एका दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर पोलीसांनी सौम्य लाठीमार केला. 

 

नंदुरबार शहरासह, शहादा, धडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

धुळे इथल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारत ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे रूग्णालयातल्या अनेक सेवांवर परिणाम दिसून आला.