नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. या हिंसाचारात ५ जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून तीन पोलीस उपायुक्तांसह ३३ ते ३४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिला. काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण-उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशा वेळी सर्वांनीच एकमेकांप्रति आदरभाव राखावा, शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलं. या हिंसाचार प्रकरणी एकंदर पाच गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधान परिषदेत निवेदन दिलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं, त्याला उत्तर आंदोलनानं द्यायला हवं होतं, मात्र तिथं पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष्य केलं गेलं, असा दावाही शिंदे यांनी केला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी सरकारवर टीका केली.