जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांनी अहिंसा हाच सर्वोच्च धर्म असून अहिंसा परमो धर्माच्या संदेशाद्वारे मानवतेला एक नवीन मार्ग दाखवला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीरांची शिकवणी आपल्याला एका करुणामय आणि सुसंवादी जगाकडे घेऊन जातात असं उपराष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे.
भगवान महावीराचे आदर्श जगभरातल्या असंख्य लोकांना बळ देतात, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचं जीवन कार्य तसंच त्यांच्या अनेकांतवादाच्या शिकवणीचं स्मरण करून देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
भगवान महावीर यांची अहिंसा, सत्य आणि करुणेची शिकवण आपल्याला सतत मार्गदर्शन करते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भगवान महावीरांचे मानवकल्याणाचे विचार आचरणात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. भगवान महावीर यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी म्हटलं आहे.