अमेरिकेने वाहनांच्या सुट्या भागांच्या आयातीवर २५ टक्के कर लावला असून याचा सर्वाधिक परिणाम चीन, जपान आणि कोरियावर होऊ शकतो, कारण वाहनांच्या सुट्या भागांचा त्यांच्या निर्यातीत ७ टक्के वाटा आहे, असं मॉर्गन स्टेनलेच्या अहवालात म्हटलं आहे.
यामुळे जपानची औद्योगिक वाढ काही प्रमाणात मंदावू शकते असंही अहवालात म्हटलं आहे. अमेरिका याशिवाय ऊर्जा, औषधनिर्मिती, सेमीकंडक्टर्स , कृषी आणि धातूंच्या आयातीवर देखील वाढीव कर लावण्याचा विचार करत आहे.
भारताची स्वतःची देशांतर्गत बाजारपेठ बळकट असल्यामुळे आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातलं निर्यातीचं प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे भारतावर या जागतिक व्यापार उलथापालथीचा परिणाम कमी होईल असं या अहवालात म्हटलं आहे.