प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आज रालोआ सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पुद्दुचेरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जो देश भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाच्या युगात अडकला होता, त्या देशाला पारदर्शक आणि लोककेंद्री प्रशासनाच्या युगात नेण्याची कामगिरी गेल्या ११ वर्षांत सरकारने केल्याचं ते म्हणाले.
भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आहे. सरकारने महिला सबलीकरण, शेतकऱ्यांचं कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलनाला प्राधान्य दिलं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधला विकास, ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वदेशी बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर आणि नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली लक्षणीय घट ही रालोआ सरकारची प्रमुख कामगिरी असल्याचंही मुरुगन यांनी नमूद केलं.