अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची प्रगती होत असल्याचं दिसतंय. मात्र राज्याचा कर महसूल कमी झाला आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते बोलत होते.
या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत. मात्र अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, पाणंद रस्त्यासाठी निधी या मागण्या त्यांनी केल्या.
मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या महायुती सरकारने अर्थसंकल्पातून जनतेला काहीही दिलं नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही असं सरदेसाई म्हणाले.
राज्यात होणारी गुंतवणूक कुठे होणार हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे अशी अपेक्षा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. शेतीमाल वाहतूक विकास कार्यक्रम सरकारने आखावा, मराठवाडा वॉटर ग्रीड या पाच वर्षांत पूर्ण करावं अशी मागणी त्यांनी केली.