सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं रस्ते संपर्क तुटल्यानं, अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायु दल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र वाईट हवामानामुळं बचाव कार्याला सुरुवात झालेली नाही. वायु दलाला हेलिकॉप्टर उतरवण्यात अडथळे येत आहेत. चाटेन इथं 130 पर्यटक असून ते त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत.
एनडीआरएफच्या सॅटेलाईट फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी अनंत जैन यांनी दिली आहे. यात महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांचा समावेश असून त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून मदतकार्याचा आढावा घेतला, तर सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी सिंगथाम इथं भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.