आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राममंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राममंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत. देशभरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रादेखील काढल्या जात आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमी आपल्याला धर्म, न्याय आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर भगवान श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहोत अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान राम हे केवळ एक पूजनीय देवता नाहीत, तर एक राष्ट्रीय प्रतीक असून प्रभू श्रीराम यांनी उपदेश केलेल्या मूल्यांचे पालन आणि जतन केले पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्यं अधिक बळकट करावीत असं आवाहन पवार यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थ रामदास यांच्या मनाच्या श्लोकातला ‘दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखतां काळ पोटी थरारी’ हा श्लोक उद्धृत करत सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.