मध्य रेल्वेच्या मिरज या मुख्य स्थानकाची रेल्वे कनेक्टिव्हीटी आणि मालवाहतूक यामध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा मिरज कॉर्ड लाईनला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. १२८ कोटी ७८ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत १ पूर्णांक ७३ किलोमीटर च्या मिरज कॉर्ड लाईन बरोबरच मल्टीट्रॅकिंग, उड्डाणपूल तसंच बायपास लाईन क्षमतेत वाढ अशी अनेक कामे केली जातील.
कुर्डूवाडी किंवा हुबळीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तांत्रिक कारणांसाठी मिरज जंक्शनजवळ एक ते दोन तास थांबतात. मिरज कॉर्ड लाईन प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा अशा मार्गांना जोडणारा एक मुख्य इंटरचेंज पॉईंट मिळेल आणि मिरज जंक्शनवरुन होणारी प्रवासी तसंच मालवाहतूक वेगवान होईल. मिरज ते कोल्हापूर प्रवास अधिक वेगवान करावा अशी मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. या प्रकल्पामुळे या मागणीच्या पूर्ततेबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे सुविधांमध्ये भर पडेल.